Showing posts with label Marathi Poetry. Show all posts
Showing posts with label Marathi Poetry. Show all posts

Sunday, December 15, 2019

म्हणे, सरकार आता आपलं आहे

म्हणे S
“सरकार आता आपलं आहे”
हे आपलेपण कुठलं आहे ?

स्वातंत्र्याची काय गत
ते तर कधीच विकलं आहे

वाघासम भासे नेता, पण
त्यात गिधाड लपलं आहे

बातम्यांना येई पूर
त्यात सत्य छापलं आहे ?

नवीन वचने नविन भाषण
पुन्हा जाळं फेकलं आहे

दिशाहीन हे राजकारण
उतलं आहे मातलं आहे

अल्लड प्रजा उनाड राजा
पेरलं तेच पिकलं आहे

लोकशाहीच्या मानगुटीवर
भांडवल-भूत बसलं आहे

नीतिमत्तेच्या सहाय्ये
आजवर कोण जिंकलं आहे?

“माझा देश माझे बांधव”
सारं काही संपलं आहे

Sunday, August 25, 2019

मदिरेचे भक्त

मदिरेचे भक्त आम्ही, आम्हा कधी पुरलीच नाही
तोची म्हणे वाइट ज्याने कधी घेतलीच नाही

शब्द-साक्षर विश्व सारे लोक मिथ्या वागती
एक चेहरा दो मुखवटे आम्हा कधी जमलेच नाही

लाल रंग मद्याचा अन लाल रंग प्रेमाचा
ही जात-पात भांडणे आम्हा कधी रुचलीच नाही

येवो कितिही संकटे, दुःख, नरक-यातना
सुरा प्रिया ही आमूची ही प्रीति कधी तूटलीच नाही

मूढ़ काही आमच्यातही येथ तेथ लोळती
मदिरेचे मर्म बाकी त्यांना कधी कळलेच नाही

चातुर्य, वित्त, सौंदर्य, सत्ता नशा कुणी केली नसे का
पण उगा कुणाला बोल लावया आम्हा कधी आलेच नाही

Saturday, April 20, 2019

फूलाचे स्वप्न

बहुत फुलावे बहुत फुलावे
फुलोनी मग सुकून जावे

बहुत सुकावे बहुत सुकावे
हलके हलके गळूनी जावे

गळूनी जावे गळूनी जावे
गळता गळता प्राणा द्यावे

पूर्ण मरावे संपूर्ण मरावे
मरता मरता स्वप्न पहावे

स्वप्न पहावे स्वप्न पहावे
सुगंधाचे स्वप्न पहावे

जन्मा यावे जन्मा यावे
जन्मा येता इतुकेच करावे -
स्वप्न-सुगंधा दरवळीत जावे

Thursday, April 18, 2019

चंद्र

दोन चंद्र एक समयी अकस्मात
आकाशी दूर एक दूजा माझे ह्रदयात

शशि आकाशी विहरतसे चांदण्यात
चांद माझा राज्य करी मझिया मनात

अणुरेणुही पाहती नभीचा निशीकांत
मम चंद्र दर्शना मी झूरतो अविरत

तो चांद नभीचा शीतल, करी दाह निशेचा शांत
चांद परि माझा तरसवी मज दिनरात

सवितेच्या चोरितो रश्मि शशी कैसा निशिकांत
जादूगार चांद माझा सौंदर्याचा आसमंत

Sunday, March 17, 2019

रे शांत होई मना

रे शांत होई मना
तुला भूर नेतो पून्हा

अट एक मात्र माझी
होई निरागस पून्हा

मग बहुल्यांशी खेळ
बोल बोबड़े पून्हा

परि सदैव विचलित तू
कैसी तुजला तमा?

सरले बालपण  माझे
का हाच माझा गुन्हा?


Re shaant hoii manaa
tulaa bhoor neto poonhaa

aṭ ek maatr maajhee
hoii niraagas poonhaa

mag bahulyaanshee kheḽ
bol bobade poonhaa

pari sadaiv vichalit too
kaisee tujalaa tamaa?

Sarale baalapaṇa  maajhe
kaa haach maajhaa gunhaa?

तेलही जळते, वातही जळते

तेलही जळते, वातही जळते
मिळून दोघे ज्योतही जळते

एके अवसी इतूक्या ज्योति
अवसांचे बाकी मनही जळते

दारी पणत्या, देव्हारी पणत्या
कुणा कुणाचे भाग्य उजळते

कुणा न खाया तेल पणतीभर
भाग्ये त्यांच्या दिवाळी जळते

कुणी विरहीजन शोक करी
रात्रिसमयी शय्याही जळते

भविष्यातल्या सुंदर गप्पा
शिळी बातमी आजहि जळते

कृषिप्रधान या देशामध्ये
शेतक-याचे घर का जळते

सरकार नव्हे ही मदमस्त सत्ता
लोकशाहीचे नशिब जळते

जळते सारे विश्वच जळते, परि
कुणास कळते? कुणास वळते?


Telahee jaḽate, vaatahee jaḽate
miḽoon doghe jyotahee jaḽate

eke avasee itookyaa jyoti
avasaanche baakee manahee jaḽate

daaree paṇaatyaa, devhaaree paṇaatyaa
kuṇaa kuṇaache bhaagy ujaḽate

kuṇaa n khaayaa tel paṇaateebhar
bhaagye tyaanchyaa divaaḽee jaḽate

kuṇaee viraheejan shok karee
raatrisamayee shayyaahee jaḽate

bhaviṣyaatalyaa sundar gappaa
shiḽee baatamee aajahi jaḽate

jaḽate saare vishvach jaḽate, pari
kuṇaas kaḽate? Kuṇaas vaḽate?

Friday, October 5, 2012

स्वर विहार

स्वर विहार करुया आपण
शब्द-सृष्टीचे संगोपन.

स्वर भूमीवरचे सुर सखे
देती जीवांना संजीवन

नव-कल्पारंभी सूर प्रिये
करती सृष्टी-सृजन


Saturday, August 18, 2012

कन्हैया लाल - आई नोकरी

चल वृंदावनी खेळू खेळ कन्हैया लाल
तू फेर वस्त्र माझे, मी पितांबर, लाल.

कंटाळा घरात येई, नोकरी करते आई,
लेकरू दाईला देई, होतात दुधाचे हाल.

मूल जेव्हा मोठे होई, कुणास ते पाही?
आसरा कुठला बाई? फोडशील का भाल?

अजीदिन तुज भावेल, परी भविष्य अंधारेल
उरीची घालामेल, करेल लाखो सवाल

दवडू नको ही वेळ, वा चुकेल सारा खेळ,
घाल संसाराचा मेळ, हृदया कर विशाल.

कन्हैया लाल - परिस्थिती

चल वृंदावनी खेळू खेळ कन्हैया लाल
तू फेर वस्त्र माझे, मी पितांबर, लाल.

अवकाळी पाऊस धारा, दुष्काळी तूफान वारा
आता नाही निवारा, झाली स्रुष्टी जहाल.

आसवांचा नदीला पूर, निघतो काननी धूर
अवनीचे जळते उर, सारी अमुची कमाल.

खेळ चालुदे सारा, नकोच देऊ सहारा,
लूटूदे धन-दारा, अपुला खेळ विशाल. (... खेळ महत्वाचा)

तुझीच लेकरे सारी, जन्मी तूच संहारी,
धरेस हाती धारी, मुखात अपुल्या घाल! (...वाट्टेल ते कर.)

Sunday, April 3, 2011

पाउस

(हि कविता शाळेत लिहिली असल्याने संग्राह्य)

अचानक - आले एक वादळ
वनचक्षुत - घालून गेले काजळ
दृमांनी - ते केले गर्जन
पावकाचे - हि झाले आगमन
मेघही - झले ज्वाला-ग्राही
सूरही - म्हणाले " त्राही त्राही"
अवनीवरती - आला वारी
सृष्टी - झाली जलमय सारी.

Saturday, April 2, 2011

मत्स्यवाणी

(हि कविता शाळेत लिहिली असल्याने संग्राह्य)

आला एक कोळी
घेऊन चांदण्यांची जाळी.
फेकता ती पाण्यात
मत्स्य गुंतला त्यात-

"हे निशादा, अडकलो जाळी,
वर देख चांदणी आभाळी.

बघ स्वैर चांदणी
मज दे सोडूनी
नभ त्यांचे जग,
जग माझे पाणी.
म्हणुनी, मज दे सोडूनी.

तुझे मंजुळ गीत ऐकत
पाहीन स्वर्ग पाण्यात.
हात दे माझ्या हाती,
दुवा देतील माझे साथी.

मज दे सोडूनी, मज दे सोडूनी, मज दे सोडूनी."

Saturday, June 12, 2010

जा लडिवाळे

जा लडिवाळे सोडुनी तव निज सदना
जा माझ्यासाठी सोडुनिया तव आसवांना.

ती इवली बाहुली, मी वाढविली का यासाठी
आज तुटले फुल लतिकेचे दुर दुर जाण्यासाठी.

त्या तुटल्या फुला सांगतो, ऐक गे लाडिके
फ़ुल असते सुवास देण्या, सोड देणे हुंदके.

जा बाळे प्रसन्न वदने अपुल्या नव सदनी
आज मुली तू झालीस अपुल्या घरी पहुणी.

Wednesday, May 26, 2010

माझे काही मराठी शेर

चाहुल अंधाराची घेउन निशा येते
प्राशून दु:ख सारे पेल्यात नशा येते

तुम्हासही का येथे छळले प्रेमाने
त्याचीच साक्ष देती आमुचेही पैमाने

तिने यावे आणि गावे गीत माझ्या भावनांचे.
आणि तिच्या मैफ़िलीत माझे काहुर शमावे वेदनांचे.

असतील झाल्या माझ्या हज़ारो चुका
करेन मीही मिळाल्या सुखांची मोजणी

हर एक म्हणे येथे सुखांचा भुकेला
ओथंबू दे माझी दु:खाने झोळणी

धरीतो कसला राग हा दुनियेवरी?
का करितो मी ही मनमानी?

अर्थात पाहते अर्थ ही दुनिया
व्यर्थ माझी प्रेमाची रडगाणी

आज मला कळले येथे मी शेवटला नर
भेकड किती फिरतात विनापुच्छ वानर

आज मला नुरले कारण जगायाचे
किती यत्न केले व्यर्थ मरायाचे

त्या पौर्णिमेच्या टिपुर चांदण्यात घेउन तुझा हात हातात
थरथरत्या अधरांच्या गुज गोष्टी मज अजुनी आठवतात.

या अर्थास नाही अर्थ
का तमा वाहिसी व्यर्थ?

नववधू

आज फुले लाजती
मी लाजता.
गगनात का मावे
आनंद, नाव घेता!

सप्तजन्मीचे बंध बांधीते
सप्तपदी घालता.
सप्तरंगात न्हाउन घेते
तूजसवे चालता.

स्वप्ने सारी बहरा आली
तुझीये दृष्टी पाहता.
शतजन्मीची साथ मागते
तुझीच ही वनिता.

तुझेच दृष्टी स्वप्न पाहीले,
तुझेच ओठी गीत गाइले,
तुझेच रंगी तन हे रंगले,
तुझेच छंदी मन हे गुंतले,
तुझेच! तुझेच !!

सर्व सर्व हे तुझेच सखया-
तूझीच प्रीती पल्लवीत मी
तूझिये द्वारी आले.
देई मजरे साथ प्रिया ती
ज्यासाठी सर्व सर्व त्यागिले.

मिलन

अधीर धारा, सूधीर वारा,
क्षणिक नदीला कुठला किनारा?

पानांतूनी सळसळ वारा,
कसला इशारा, झाडांचा?

होऊ देत सरींचा मारा,
नको निवारा छपराचा.

अंगावरी येतो शहारा,
उगा पहारा, भीतीचा.

लाट

खेळवितो तूज वायू
हा खेळ जीवघेणा
कोसळूनी खडकावरती
का संपविसी जीवना?

क्षणात वायूवेगे-
होतेस मृत्यूची दासी
भूलतेस कोण्यायोगे
वायूच्या वचनांसी.

हा निनाद कसला करीसी?
का क्षणात लूप्त होते परि,
तूज मोह जीवनाचा
नाही का अंतरी?

कि तुझे मनही मझेपरी
उदासीन असते
मज सांग मृत्युसी
का तू आलिंगण देते?

का तूज मोक्ष नाही
कि, मनोयोगे हे अवतरणे.
हे गूढ सांग सत्वरी
एकच आहे मागणे.

जीवन क्षणिक सुखांचे
सार्‍या जगास गे भुलविते
परि, सुखसागर सोडूनी-
कशी तू, मृत्यूयोगी रमते?

वाट

दिसं आला डोईवर
भुई थांबता थांबेना
मला वाट जीवनाची
काही केल्या सापडेना.

माझं जीनं हे अपूरं
त्याला पूरं कसं करू
माझ्या श्वासांची साखळी
काही तूटता तूटेना.

विकतचे श्वास सारे
मन भिते उजेडाला
लागे उरातही आगऽ
काही विझता विझेना.

सारी जिमीन फाटली
नदी उन्हानं आटली
माझ्या जीवनाचा समंदर
काही अटता आटेना.

लाली

मज गाली
तव अधरांची लाली
बहरली
जणु प्रीतीने चुंबन घेता प्रियाचे.

मज गाली
तव अधरांची लाली
मोहरली
जणू मातेने लाड पुरविता बाळाचे.

मज गाली
तव अधरांची लाली
शहारली
जणू गगनाने आलिंगण देता धरणीते.

मज गाली
तव अधरांची लाली
नटली
जणू नववधू गोजिरी अलंकारे

निर्माता

निर्मूणी सृष्टी गेला
गेला सृष्टी-कर्ता.
रमले सारे विश्वी येथे
तूज कोण आठवे आता?

जगतात येथे सारे
जीव आणि जंतूही.
देहास ज्या तू प्राण दिला
तो यातील कोण होता?

भुलले सारे स्पंदनी
हे, जीवनच्या बंधनी,
भीतात मृत्यूसही, मानती
तू न तयांचा त्राता...!

ज्ञानी म्हणती मुढमती
स्वतःस सारे जगती,
मग प्रमाण कैसे मागती
का तूच तयंचा त्राता?

जीवन हे असंच असतं

जीवन हे असंच असतं
काटेरी वाटेवर क्षणभर थांबायचं
कि, प्रवाहासारखं वहावतच जायचं
हे आपणंच ठरवायचं असतं

हात लावताच पाकळी-पाकळी व्हायचं
कि, गुलाबसारखंच काट्यातही फुलायचं
हे आपणंच ठरवायचं असतं

श्रावण सरींत नयनांनीही बरसायचं
कि, घनासोबत सारंकाही लूटून द्यायचं
हे आपणंच ठरवायचं असतं

पातेवरच्या थेंबावर मोती म्हणून प्रेम करायचं
कि, रानीवनीचं पाणी म्हणून लाथाडून द्यायचं
हे आपणंच ठरवायचं असतं

जीवन हे असंच असतं
वाहत्या प्रवाहासारखं,
काट्यातल्या गुलाबासारखं,
श्रावणातल्या घनासारखं,
पातेवरच्या मोत्यासारखं
जीवन हे असंच असतं.
आणि जीवन हे असंच असावं-

नयनांत आसू असल्यावर
ओठांवर हसू ठेवणारं
गळतीचं पान होऊन शोक करण्यापेक्षा
उगवतीचे रंग होउन मनात साठणारं
आणि आपण नसतनाही
असल्याची जाणीव करून देणारं
जीवन हे असंच असावं...