Showing posts with label Marathi Prose. Show all posts
Showing posts with label Marathi Prose. Show all posts

Monday, April 15, 2019

उत्तेजन आणि प्रक्षोभक विधाने

उत्तेजन हे प्रक्षोभक विधानांना जन्म देते आणि प्रक्षोभक विधाने हि वाचणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना उत्तेजित करतात. पुन्हा तशीच विधाने, उत्तरे, प्रतिप्रश्न होतात. एक चक्र सुरु होते जे विषयाभोवती फिरत राहते पण त्याचा गाभा गाठत नाही. परिक्रमा चालू असल्याने त्यात भाग घेणाऱ्यांना असे वाटते कि आपण पुढे जात आहोत पण मुळात ते व्यासाभोवातीच फिरत असतात.

आजमितीला उत्तेजानपूर्ण वक्तव्ये आणि विधाने ही राजकारण प्रेरित असतात आणि विष पेरीत असतात. त्यामुळे काही काळासाठी का होईना पण समाज अस्थिर होऊन आपापसात कलह निर्माण करतो आणि त्याचा राजकीय फायदा घेतला जातो. ही अस्थिरता पुढे बऱ्याच प्रश्नांना जन्म देते आणि सुप्त रुपाने लोकांच्या मनात घर करून राहते. त्यामुळे थोडे कोणी काही उलट बोलले कि त्याचे उलट आणि दीर्घकालीन परिणाम दिसून येतात.

सुधारक वक्तव्यांना प्रक्षोभक असण्याची आवश्यकता नसते. आपले विचार किती प्रगल्भ आहेत यावर लोक तुमचे किती ऐकायचे हे ठरवतात. आपण जर इतिहास पहिला तर लक्षात येईल कि ज्या लोकांनी समाज सुधारणा केली ते उत्तेजित होत नसत. सखोल पाणी हे तितकेच शिथिल असते. कितीही नद्या सागरात मिळाल्या तरी अखंड सागर उसळत नाही. त्याला जेव्हा गरज असते तेव्हाच तो भरती किंवा ओहोटी घेत असतो.

कोणतीही चर्चा किंवा मंथन करताना शांत वातावरण आणि शांत मनःस्थिती दोन्हीही आवश्यक असतात. तिथे उत्तेजित होऊन विधाने मांडली कि ती चुकण्याची शक्यता दाट असते त्यामुळे पुढे चर्चेचे रुपांतर गोंधळात होते आणि हाती काहीही लागत नाही. संसदेतील गोंधळही कदाचित आपल्या मागे राहण्याला कारण असेल. शांतपणे आणि विचारपूर्वक मांडलेले विषय अथवा उत्तरे लोक वाचतात आणि प्रतिक्रिया देतात. आणि निश्चितच विषय पुढे सरकू शकतो, निर्णायक ठरू शकतो अथवा एक पैलू तरी उलगडतो.

शाळा व कॉलेज - पाठांतर

'हिरवे हिरवे गार गालिचे...' पाठ होत नव्हतं म्हणून मास्तरांनी आम्हाला गालिच्यावर झोपायच्या लायक ठेवलं नव्हतं. शाळेत पाठांतर ही एक अत्यंत आवश्यक बाब होती. काही समजले नाही तरी चलेल पण पाठ असायला हवे. इंग्रजी शब्दांनी तर अगदी उच्छाद मांडला होता. रोज दहा शब्द पाठ करायचे आणि शब्द चूकला तर छडी उलटया हाताला छेद देवुन तळ हात लाल करायची. आणि म्हणूनच की काय आज सगळे शब्द खडानखडा ओठांवर येतात, जर काही येत नसेल तर ते इंग्रजी...!

पूढे पठांतरावर अमचा एवढा विश्वास बसला की कॉलेजात गेल्यावर एकही दिवस क्लासमधे न जाता परिक्षेच्या पूर्वरात्री अतिउत्तम पाठांतर करुन पेपर मधे पास होउन जगाला आश्चर्यचकित करण्याची कला आमच्या अंगी विकसित झाली जीला आज सर्वसामान्यांच्या भाषेत “दी लास्ट नाइट स्टडी” अशी संज्ञा मिळाली आहे. गेल्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका एकत्र करुन त्यातून नेहमी येणारी मोजकी प्रश्न बाजुला काढायची, त्यावर काही अनाकलनिय अंदाज बांधायचे आणि तेवढीच प्रश्न (आणि उत्तरही!) मूकपाठ करायची जेणेकरुन पास होण्याची खात्री होईल. बाकी डिस्टिंक्शन मध्ये येणे, पहिले येणे या सर्व कोचिंग क्लासेसवाल्यांनी काढलेल्या भ्रामक कल्पना अाहेत असे समजावे आणि गुमान पास होण्यात धन्यता मानावी त्यातच सामान्यांचे (बुद्धीने) हित असते. तसही पहिले येवून मेडिकलला नंबर लागला जरी तरीही अॅड्मिशनच्या फीचा खर्च झेपणार आहे कुणाला? त्यामूळे पालकांना कुठल्याही आर्थिक पेचात न टाकता सुखाने पास व्हावे. हं आता त्याने अतिशय साधारण विद्यार्थी असण्याचा दोष अंगी लागतो पण इतरांच्या हिताप्रित्यर्थ स्वत:च्या शीरावर घेतलेल्या दोषांत कसलेही पातक नसते हे विधान तर सर्वसम्मतच आहे. नाही का?

Sunday, April 14, 2019

शाळा व कॉलेज


मँट्रिकनंतर आमची रवानगी झाली ती थेट कॉलेजात. मुले (म्हणजे मुली पण) वयात आले कि त्यांच्यात  प्रचंड बदल होतात असं मी कुठेतरी ऐकलं होतं. पण वयात यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि तेही १६ वर्षांनी. मग त्याआधी जे जगलो त्याचं काय? म्हणजे त्याअधीची १५ वर्ष देवाने बोनस दिली होती की काय? जाउ दे. तर मुद्याचं असं कि आम्ही काँलेजात जायला लागलो. काँलेजात गेल्यावर इतके बदल होतात हे मला माहितीच नव्हतं. अहो, शाळेची आमची इमारत उतानं पडलेल्या अजगरा सारखी आडवी पसरलेली होती (आमचं बालपण गिळत) आणि इथे काँलेजची बिल्डिंग एखाद्या सुंदर सडपातळ तरुणी सारखी उभी राहीली होती. इथे तासांचे क्लास झालेले होते, वर्गांचे क्लासरूम, दोन तासांमध्ये ५ मिनिटांची विश्रांती काही विचारू नका. विशेष म्हणजे शाळेतले साठी उलटलेले मास्तर जाउन त्यांच्या जागी अमच्या पेक्षा वयाने अगदि थोड्याशा मोठ्या अशा लेक्चरर आल्या होत्या. शाळेतले मास्तर आठवले की आजही काटा येतो अंगावर.

-शाळेत असताना परीक्षेचा निकाल लागायच्या आधी आमचा निकाल लागायचा. कारण मास्तरांनी आम्हा  सर्वांनाच बृहस्पती बनवायची शपथ होती. ७५ टक्क्यांपेक्षा जितके  टक्के कमी तितक्या छड्या खायच्या. छडीचे मालक तिला छडी म्हणत नसत, ते तिला राजदंड म्हणायचे. त्या राजदंडाच आमच्यावर खूप प्रेम. भर दरबारात त्या राजदंडानी आमची कुठे कुठे आणि कशी कशी चुंबने घेतली हे आठवलं कि आजही अंग अंग शहारतं. इतर हंगामी शिक्षकही कधी काडीने, हाताने, बोलून स्वतःच्या मनोकामना तृप्त करीत असत. पण आम्हाला एक नेहमी वाटायचं बरका! कि जो शिक्षक जास्त मारतो त्याने त्याच्या बालपणी एवढा मार खाल्ला असावा म्हणून बिचारा सूड भावनेने मारतो. त्यामुळे त्याचा जितका राग यायचा तितकीच दयाही यायची. समदुःखी ना! शेवटी माणूस माणसाचं दुःख समजून नाही घेणार तर कोण?

...आज कॉलेजात लेक्चरर आम्हाला एका शब्दाने देखील विचारात नाही. आपले प्रवचन संपवतो आणि आल्या वाटेने निघून जातो.

अहो! शाळेत अम्हाला आमची पायरी कधी सोडता आली नाही आणि इथेतर आम्ही जीनेच्या जीने पायंदळी तूडवायला लागलो होतो. त्याकाळी अम्हाला मुलींकडे पाहणंसूद्धा पाप होतं. आता, बरSका, अम्हाला एखादी मैत्रीण नसेल तर मुलं नाव ठेवायची. एवढच काय तर लहानपणी ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असं आमच्या निरागस मनावर कोरलं होतं त्याच गोष्टींमधे आयुष्याचं खरं गमक आहे हे आम्हाला इथे आल्यावर कळालं.

अरे, जिथे कृष्णाने सोळा-सहस्त्र लग्ने केली(स्वत:चीच) तिथे, आम्ही दोन मुलींबरोबर हातात हात घालून बसलो आणि केल्या चार गप्पा तर बिघडले कुठे? आणि आपल्या संस्कृतीशी एकरुप होण्याची संधी याशिवाय दुसरी असेलच कशी? अहो लहानपणी बाबा म्हणायचे, "बाळ, जरा एकांतात बसून चार पुस्तके वाचून काढावित त्याने वाचन सुधारते". आणि आम्हीही अभ्यासू, खरोखर शांत ठिकाणी जाऊन पुस्तकं वाचत बसायचो. पण ते खरं वाचन नव्हतच, तर निर्जन स्थानी एका कांतेला जवळ बसवुन तिच्या चेहर्याचे वाचन करावे त्याने जीवन सुधारते हे काँलेजात अम्हाला प्रथम कळालं. अरे वाचन मोठं कि वाचनं मोठं?

'हिरवे हिरवे गार गालिचे' पाठ होत नव्हतं म्हणून मास्तरांनी आम्हाला गालिच्यावर झोपायच्या लायक ठेवलं नव्हतं.


Friday, February 11, 2011

गद्य ३

एखादया गोष्टीची प्रतीक्षा केल्यापेक्षा, ती भेटली तर आणि नाही भेटली तर काय करावे यावर विचार करावा. त्याने वेळ वाचतो, मन संतुलित राहते आणि दोन्ही गोष्टींना सामोरे जाण्यास मदत होते.

परमेश्वर आहे नक्कीच आहे!- काल रात्री जेवणाच्या वेळी आई माझ्या २ वर्षाच्या पुतण्याला म्हणाली "तू ह्या ताटात बस" आणि तो उठून चक्क त्या ताटात मध्यभागी बसला. उद्विग्न असलेले माझे मन खदखदुन हसले. आपल्या निरागस भावाने दुःख विसरायला लावणारा तोच परमेश्वर कोणत्या रुपाने येईल, सांगणे कठीण.

भारतीय धर्म आणि इंग्रजी Religion यांची गफलत करू नका. निःसंशय दोन्हीही वेगळे.

एखादया कर्तृत्ववान पुरुषाला देवाचा अवतार मानणे म्हणजे त्याचे कर्तृत्व संपुष्टात आणणे. कारण देवास  काहीही अशक्य नाही.

सुख आणि दुःख यांचे काहीही अस्थित्व नाही. त्या फक्त मनाच्या दोन अवस्था. त्यामुळे सुखाने भुलून जाणे जितके अयोग्य तितकेच दुःखाने खचून जाणेही अयोग्य.

अमुक चूकीचे आणि आमूक बरोबर हे कृतीवर अवलंबून नसून ते परिस्थितीवर आहे. - पार्वती कधी काळी सती गेली तेव्हा ती बरोबर होती पण आज स्त्रीला बळजबरीने सती देणे हे चूक. कृती तीच पण परिस्थिती निराळी.

सौंदर्य हा स्त्रीचा दागिना असेल तर त्याचे प्रदर्शन योग्य ठिकाणी झालेलेच चांगले अन्यथा लुबाडले जाण्याचा धोका संभवतो.

स्त्रीच्या पेहरावाने तिचे सौंदर्य खुलत असेल तर उत्तम पण ते उघडे पडत असेल तर लज्जास्पद.

म्हातारपणी काय होईल याची चिंता वाहताना बरेच लोक दिसतात पण मृत्युनंतर काय होईल? हा ही प्रश्न पडायला हवा.

गद्य २

संपूर्ण स्वातंत्र्याचे भविष्य पारतंत्र्यापेक्षाही भयानक असते.

केलेल्या कृती पेक्षा ती कोणत्या भावनेने केली यास महत्व अधिक.- अपमानित द्रौपदी, पांडवांची पत्नी होती म्हणून युद्ध करणे चूक पण ज्या राज्यात राणीचाही अपमान होतो ते राज्य लयास जावे म्हणून युद्ध करणे योग्य.

आम्ही पाश्चिमात्यांना शून्य दिला आणि त्यांनी त्यातून विश्व निर्माण केले. आम्ही मात्र त्या दानाच्या अभिमानाचे ओझे आजही वाहतोय.

आपले सौंदर्य मोरपंखांनीच आहे हे काय मोरास ठाऊक नाही? पण त्यातून चार गळून पडतील म्हणून तो पिसारा फुलावाचा थांबवत नाही.

कबीराने चोरी करण्याच्या फंदात पडू नये अन्यथा गर्दन छाटली जाते.

पाश्चिमात्य मोठे हुशार त्यांनी आमच्या कडून ज्ञान घेतले. आम्ही मात्र कपडेच आणि तेही वितभर.

आमच्या येथील बरीच उंदरे परदेशी गेली आणि तेथील लाडू आवडला म्हणून इथल्या मातीला विसरली.

स्वभावात स्वाभाविकातेचा अभाव असल्यास जगण्यातली सहाजीकता नष्ट होते.

कर्तेपणाची जाणीव ही फल-अपेक्षेला कारण ठरते आणि त्यातून सुख किंवा दुःख यांची उत्पत्ती होते.

भविष्याची चिंता वाहण्या पेक्षा त्याचे नियोजन करणे अधिक सोयीस्कर.

Thursday, February 10, 2011

गद्य १

तारुण्यात सौंदर्याला भूलने पाप नाही, पण सौंदर्याच्या आहारी जाण्यासारखा शाप नाही.

जगायला कारण नाही म्हणून मृत्यूची अपेक्षा करणे, हा जीवनच नाही तर मृत्यूचाही अपमान आहे.

प्रसाद मागावा तो ज्ञानेश्वरांनी, आम्ही तर फक्त स्वार्थाची साखर आणि तिचा शिरा यातच समाधानी.

भूक, मग ती कोणतीही असो, पूर्ण तृप्त होता कामा नये. अपचनाचा धोका असतो.

अपूर्ण आकांक्षाना कवटाळून निवृत्त होणे म्हणजे त्याच आकांक्षांची नवीन आवृत्ती घेऊन पुन्हा जन्माला येणे.

दुरावास्थेने चून जाणे म्हणजेच दुःख.

मन मारून जगण्याने प्रगती खुंटते आणि मनास न आवरून जगण्याने अधोगती होते.

अहिंसेचा अतिरेक हा देखील हिंसेला कारण ठरतो.

देवाविषयीचा कर्मठपणा देवाजवळ तर नेत नाहीच पण माणसापासूनही दूर नेतो.

पाश्चिमात्य लोक जेव्हा आमच्या तत्त्वज्ञानावर शिक्कामोर्तब करतात तेव्हा आम्ही आमचे तत्वज्ञान मानतो. काय ही आमची दुरावस्था!