Sunday, April 14, 2019

शाळा व कॉलेज


मँट्रिकनंतर आमची रवानगी झाली ती थेट कॉलेजात. मुले (म्हणजे मुली पण) वयात आले कि त्यांच्यात  प्रचंड बदल होतात असं मी कुठेतरी ऐकलं होतं. पण वयात यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि तेही १६ वर्षांनी. मग त्याआधी जे जगलो त्याचं काय? म्हणजे त्याअधीची १५ वर्ष देवाने बोनस दिली होती की काय? जाउ दे. तर मुद्याचं असं कि आम्ही काँलेजात जायला लागलो. काँलेजात गेल्यावर इतके बदल होतात हे मला माहितीच नव्हतं. अहो, शाळेची आमची इमारत उतानं पडलेल्या अजगरा सारखी आडवी पसरलेली होती (आमचं बालपण गिळत) आणि इथे काँलेजची बिल्डिंग एखाद्या सुंदर सडपातळ तरुणी सारखी उभी राहीली होती. इथे तासांचे क्लास झालेले होते, वर्गांचे क्लासरूम, दोन तासांमध्ये ५ मिनिटांची विश्रांती काही विचारू नका. विशेष म्हणजे शाळेतले साठी उलटलेले मास्तर जाउन त्यांच्या जागी अमच्या पेक्षा वयाने अगदि थोड्याशा मोठ्या अशा लेक्चरर आल्या होत्या. शाळेतले मास्तर आठवले की आजही काटा येतो अंगावर.

-शाळेत असताना परीक्षेचा निकाल लागायच्या आधी आमचा निकाल लागायचा. कारण मास्तरांनी आम्हा  सर्वांनाच बृहस्पती बनवायची शपथ होती. ७५ टक्क्यांपेक्षा जितके  टक्के कमी तितक्या छड्या खायच्या. छडीचे मालक तिला छडी म्हणत नसत, ते तिला राजदंड म्हणायचे. त्या राजदंडाच आमच्यावर खूप प्रेम. भर दरबारात त्या राजदंडानी आमची कुठे कुठे आणि कशी कशी चुंबने घेतली हे आठवलं कि आजही अंग अंग शहारतं. इतर हंगामी शिक्षकही कधी काडीने, हाताने, बोलून स्वतःच्या मनोकामना तृप्त करीत असत. पण आम्हाला एक नेहमी वाटायचं बरका! कि जो शिक्षक जास्त मारतो त्याने त्याच्या बालपणी एवढा मार खाल्ला असावा म्हणून बिचारा सूड भावनेने मारतो. त्यामुळे त्याचा जितका राग यायचा तितकीच दयाही यायची. समदुःखी ना! शेवटी माणूस माणसाचं दुःख समजून नाही घेणार तर कोण?

...आज कॉलेजात लेक्चरर आम्हाला एका शब्दाने देखील विचारात नाही. आपले प्रवचन संपवतो आणि आल्या वाटेने निघून जातो.

अहो! शाळेत अम्हाला आमची पायरी कधी सोडता आली नाही आणि इथेतर आम्ही जीनेच्या जीने पायंदळी तूडवायला लागलो होतो. त्याकाळी अम्हाला मुलींकडे पाहणंसूद्धा पाप होतं. आता, बरSका, अम्हाला एखादी मैत्रीण नसेल तर मुलं नाव ठेवायची. एवढच काय तर लहानपणी ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असं आमच्या निरागस मनावर कोरलं होतं त्याच गोष्टींमधे आयुष्याचं खरं गमक आहे हे आम्हाला इथे आल्यावर कळालं.

अरे, जिथे कृष्णाने सोळा-सहस्त्र लग्ने केली(स्वत:चीच) तिथे, आम्ही दोन मुलींबरोबर हातात हात घालून बसलो आणि केल्या चार गप्पा तर बिघडले कुठे? आणि आपल्या संस्कृतीशी एकरुप होण्याची संधी याशिवाय दुसरी असेलच कशी? अहो लहानपणी बाबा म्हणायचे, "बाळ, जरा एकांतात बसून चार पुस्तके वाचून काढावित त्याने वाचन सुधारते". आणि आम्हीही अभ्यासू, खरोखर शांत ठिकाणी जाऊन पुस्तकं वाचत बसायचो. पण ते खरं वाचन नव्हतच, तर निर्जन स्थानी एका कांतेला जवळ बसवुन तिच्या चेहर्याचे वाचन करावे त्याने जीवन सुधारते हे काँलेजात अम्हाला प्रथम कळालं. अरे वाचन मोठं कि वाचनं मोठं?

'हिरवे हिरवे गार गालिचे' पाठ होत नव्हतं म्हणून मास्तरांनी आम्हाला गालिच्यावर झोपायच्या लायक ठेवलं नव्हतं.


No comments:

Post a Comment